पाटणा-वृत्तसेवा | जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी भाजपची संगत सोडून दुसर्याच दिवशी आरजेडी, कॉंग्रेस व अन्य पक्षांच्या सहकार्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
नितीश कुमार यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला होता. त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द केल्यानंतर लागलीच सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस, डावे पक्ष आणि अन्य लहान पक्षांचे महागठबंधन करून त्यांनी आपण सरकार स्थापन करणार असल्याचे राज्यपालांना सांगितले होते. यानुसार त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
या अनुषंगाने आज दुपारी दोनच्या सुमारास नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत लालूंचे पुत्र तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या माध्यमातून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा यशस्वी राजकीय खेळी केली आहे.