नैरोबी: वृत्तसंस्था । ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर आता आणखी एका देशात आणखी एक नवीन स्ट्रेन आढळाला आहे. कोरोनाचा हा तिसरा नवा स्ट्रेन नायजेरियातील लोकांमध्ये आढळला असल्याची माहिती आफ्रिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
या नव्या स्ट्रेनबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी शास्त्रज्ञांची एक टीम संशोधन करत आहे. ब्रिटनमध्ये दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या दोन प्रवाशांमध्ये कोरोनाचा आणखी एक स्ट्रेन आढळला होता.
आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनचे प्रमुख डॉ. जॉन नेकेंगसाँग यांनी सांगतिले की, हा नवा स्ट्रेन ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा वेगळा आहे. या स्ट्रेनबाबतचा अधिक तपास नायजेरिया सीडीसी आणि आफ्रिकन सेंटर ऑफ एक्सीलेंस फॉर जीनोमिक्स ऑफ इंफेक्शियस डिजीजचे शास्त्रज्ञ करत असल्याची माहिती त्यांनी दिली. या नव्या स्ट्रेनच्या स्वरुपाबाबत अधिक माहिती समोर येण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
डॉ. जॉन नेकेंगसाँग यांनी सांगतिले की, नायजेरियात आढळलेल्या स्ट्रेनचा प्रभाव किती आहे, हे अद्याप समजले नाही. मात्र, एका रिपोर्टनुसार, ३ ऑगस्ट आणि ९ ऑक्टोबर दरम्यान दक्षिणी ओसून राज्यातील लागोसच्या उत्तरेपासून १०० मैल अंतरावर जमा करण्यात आलेल्या दोन रुग्णांच्या नमुन्यात कोरोना विषाणूचा हा नायजेरियन स्ट्रेन आढळला. कोरोनाच्या या नायजेरियन स्ट्रेनला P681H असे नाव देण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा हा नवा स्ट्रेन दोन किंवा तीन जेनेटिक सीक्वेसवर आधारीत आहे. मागील काही आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत बाधितांच्या वाढत्या आकड्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला होता. आफ्रिका खंडात संसर्ग फैलावत असून आफ्रिकेच्या सीडीसीने एक आपात्कालीन बैठक बोलावली.
या व्हारसच्या नवीन प्रकाराने ब्रिटन सावरत नाही तोच त्याहून अधिक संसर्गजन्य आणखी एक कोरोना व्हायरस आढळून आला आहे. यामुळे ब्रिटन हादरलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचा आणखी एक नवीन प्रकार आढळून आला आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी दिली.