नाथाभाऊ भाजपमध्ये परत या ! : विनोद तावडेंची साद

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये परत यावे अशी साद भाजप नेते विनोद तावडे यांनी घातली असली तरी नाथाभाऊंनी मात्र याचा लागलीच इन्कार केला आहे.

 

भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर एकनाथराव खडसे यांना आमदारकी मिळाली असून ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी अलीकडेच नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यानंतर थेट विनोद तावडे यांनीच खडसे यांना साद घातली आहे.

 

मुंबई तक या पोर्टलशी बोलतांना विनोद तावडे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी भाजपत परत आलं पाहिजे, त्यांच्यासारख्या नेत्याची पक्षाला गरज आहेच. त्यांच्यासारख्या वरिष्ठ लोकांनी येणं पण नुसतं येणं म्हणजे नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेलच. पण जी जी माणसं पक्षात आली पाहिजेत असं आम्हाला वाटतं त्यानुसार नाथाभाऊंनी नक्की आलं पाहिजे असे ते म्हणाले.

 

दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे यांनी लागलीच यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, माझ्यासह अन्य नेत्यांनी भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न केलेच. मात्र २०१४ नंतर माझा खूप छळ करण्यात आला. राष्ट्रवादीने मला नव्याने उभारी देत आमदारकी दिली असून आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे खडसे म्हणाले.

Protected Content