मुंबई प्रतिनिधी । नाथाभाऊ हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून पक्ष वाढीत त्यांचा मोलाचा वाटा असला तरी पक्षाने त्यांना आजवर बरेच काही दिले असून त्यांनी नाराज होण्याचे कोणतेही कारण नसल्याचे वक्तव्य करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
विधानपरिषदेत तिकिट नाकारल्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे दोन दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. या पार्श्वभूमिवर, आज साम टिव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना प्रत्युत्तर देत या प्रकरणी पक्षाची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, नाथाभाऊंनी पक्ष वाढीसाठी नक्कीच प्रयत्न केले. तथापि, त्यांना पक्षाने महत्वाची पदे देखील दिली. त्यांच्या घरात खासदारकी असून पत्नीलाही सहकारातील मोठे पद देण्यात आले आहे. तर विधानसभेसाठी मुलीला तिकिट दिले होते. यामुळे आजवर पक्षाने खडसे यांचे ऐकले असेल तर एखाद्या मुद्यात ऐकले नाही तर बिघडते काय ? असा सवाल त्यांनी केला.
या मुलाखतीत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, विधानपरिषदेसाठी अनेक जण स्पर्धेत होते. खरं तर जागा चार असल्या तरी ४० जण स्पर्धेत होते. यामुळे पक्षासाठी काम करणार्यांना तिकिट देण्याचे धोरण श्रेष्ठींनी अंमलात आणले असून यानुसारच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथराव खडसे अथवा पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी नाराज होण्याचे काहीही कारण नसल्याची पुस्ती देखील त्यांनी जोडली.