मुंबई: वृत्तसंस्था । काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणातून बाजूला पडत गेले. भूखंड घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर सुरुवातीला त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. कालांतरानं क्लीन चिट मिळाल्यानंतरही त्यांना सरकारमध्ये स्थान मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही डावलण्यात आले. विधान परिषदेतही संधी नाकारली गेली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना स्थान देतानाही खडसेंचा विचार केला गेला नाही. ही शेवटची संधीही हुकल्यानं अखेर खडसेंनी पक्षातरांचा निर्णय घेतला.
जळगाव जिल्ह्यात सध्या खडसेंच्या पक्षांतराचीच चर्चा आहे. ते राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत यावरून सुरुवातीला तर्कवितर्क मांडले जात होते. मात्र, ते राष्ट्रवादीतच जाणार असून गुरुवारी मुंबईत एका सोहळ्यात ते प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. खडसेंच्या कन्या व जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे व इतर सहकारीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या विश्वासातील लोकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.