मुंबई प्रतिनिधी । क्रिसमस अर्थात नाताळ सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारने आज नियमावली जाहीर केली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने क्रिसमस पर्व साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले असून याबाबतची नियमावली जाहीर केली आहे. याच्या अंतर्गत चर्चमध्ये आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमात ५०हून जास्त जणांचा समावेश नसावा व कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. याच्या जोडीला चर्चच्या परिसरात फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करून सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहेत. चर्चमध्ये प्रभू येशुचं स्तुतीगीत गाण्यासाठी १०हून जास्त व्यक्तींचा सहभाग नसावा. याप्रसंगी माइक स्वच्छ असण्याबाबत काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखाली लहान मुलांनी चर्चमध्ये आणि घराबाहेर जाणं टाळावं. याऐवजी यंदा त्यांनी घरातच हा सण साजरा करावा. गर्दीला आकर्षित करणारे देखावे, आतिषबाजीचं आयोजन करु नये असे या नियमावलीत सांगण्यात आले आहे. या नियमावलीचं पालन करत नागरिकांनी नाताळ साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.