पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नाचणखेडा येथे राबवण्यात आलेल्या विशेष रुग्ण शोध पंधरवडा मोहीम अंतर्गत घेतलेल्या ५२ जणांच्या तपासणी अहवाला पैकी ५०जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांना मात्र कोरोनाची बाधा झाली आहे.
जामनेर तालुक्यात नाचणखेडा येथे मालेगाव शहराच्या धर्तीवर रुग्ण शोध पंधरवाडा राबविण्यात आला असून २०४ जणांची तपासणी करण्यात आली होती. यात ५२ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्या पैकी ५० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याने नाचणखेडा येथील कोरोना संक्रमणाची सामाजिक साखळी खंडीत झाल्याचे समोर आले आहे. तर येथील दोन रूग्ण मात्र पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यांचे वय अनुक्रमे ३८ आणि ५८ वर्षे इतके आहेत. या माहितीला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षद चांदा यांनी दुजोरा दिला आहे. जामनेर तालुक्यातील प्रशासनाने ही मोहीम प्रथमच राबविली. दरम्यान, नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .