जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी जिल्ह्यात आतापर्यंत 8605 बाधित रुग्णांपैकी 5470 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिलह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर गेले आहे ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत 42 हजार 62 कोरोना संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 32 हजार 251 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात निगेटिव्ह अहवालाचे प्रमाण 76.67% इतके आहे. तर 8605 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. याचे प्रमाण जिल्ह्यात 20.45% इतके आहे. महिनाभरापूर्वी रुग्णसंख्येच्या माणाने जिल्ह्यातील मृत्यूदर 12 टक्क्यांपर्यत होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना आणि लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या सहकार्याने तो सद्यस्थितीत आटोक्यात आणण्यात प्रशासनास यश आले असून सध्या हा मृत्युदर रुग्ण संख्येच्या 4.9 % पर्यंत आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता सोशल, फिजिकल डिसटन्सिंगच्या नियमांचे पालन करीत जागरुकता बाळगल्यास जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यास नक्कीच यश येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात 4471 तपासण्या रॅपिड अॅन्टिजेन चाचणीद्वारे
अनलॉकनंतरच्या काळात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी तातडीने होण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. तसेच इतर तीन खाजगी प्रयोगशाळांमार्फतही तपासणी करण्यात येत आहे. शिवाय रॅपिड ॲटिजेन तपासणीद्वारेही अहवाल तपासण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजार 62 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4471 चाचण्या रॅपिड अॅन्टिजेन तर 37 हजार 591 चाचण्या आरटीपीसीआरद्वारे करण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआरद्वारे 28 हजार 482 तर रॅपिड अॅन्टिजेनद्वारे 3 हजार 769 अशा एकूण 32 हजार 251 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून आरटीपीसीआरद्वारे 7 हजार 903 तर रॅपिड अॅन्टिजेनद्वारे 702 अशा एकूण 8 हजार 605 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
मृत व्यक्तींपैकी 361 व्यक्ती 50 वर्षावरील वयाचा तर 232 व्यक्तींना इतर आजार
जिल्ह्यात मार्च 2020 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. सदरचा रुग्ण बरा झाला परंतु त्यांच्या संपर्कातील व्यक्ती मात्र 50 वर्षापेक्षा अधिक वयाची तसेच त्यास इतर जुने आजार असल्यामुळे मृत्यु पावली होती. जिल्ह्यात आतापर्यत आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी 427 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यु झालेल्या व्यक्तींपैकी 361 व्यक्ती या 50 वर्षावरील वयाचा होत्या तर 232 व्यक्तींना इतर आजार होते. त्यामुळे वयोवृध्द व जुने आजार असलेल्या नागरीकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तत्काळ आपली तपासणी करुन घ्यावी. असे आवाहनपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये 1006 बेड तर विलगीकरण कक्षात 1070 बेड उपलब्ध
जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविड केअर सेंटर मध्ये 1 हजार 912 रुग्ण उपचार घेत असून 129 बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यात विलगीकरण कक्षात 806 रुग्ण असून विलगीकरण कक्षात 1070 बेड उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये 209 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर 599 बेड उपलब्ध आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 587 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर 282 बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी 338 रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात 5470 बाधितांची कोरोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या आठ हजार सहाशे पाच रुग्णांपैकी जळगाव शहरातील 2232 रुग्ण आढळले आहे. त्यापैकी 1367 रुग्ण बरे झाले आहेत तर 782 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये 380 रुग्णांपैकी 171 रुग्ण बरे झाले असून 185 रुग्णांवर उपचार सुरु आहे, भुसावळ तालुक्यात 747 रुग्णांपैकी 473 रुग्ण बरे झाले असून 216 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमळनेर येथे 589 रुग्णांपैकी 438 रुग्ण बरे झाले असून 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चोपडा 594 रुग्णांपैकी 379 रुग्ण बरे झाले असून 190 रुग्ण उपचार घेत आहेत. पाचोरा 245 रुग्णांपैकी 127 रुग्ण बरे झाले असून 102 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भडगाव 327 रुग्णांपैकी 287 रुग्ण बरे झाले असून तीस रुग्ण उपचार घेत आहेत. धरणगाव 382 रुग्णांपैकी 236 रुग्ण बरे झाले असून 123 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यावल तालुक्यात 378 रुग्णांपैकी 316 रुग्ण बरे झाले असून 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एरंडोल 389 रुग्णांपैकी 264 रुग्ण बरे झाले असून 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, जामनेर तालुक्यात आतापर्यंत 547 रुग्ण आढळून आले असून 209 रुग्ण उपचाराअंती बरे झाले तर 310 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रावेर तालुक्यात 594 रुग्णांपैकी 393 रुग्णांवर उपचार होऊन बरे झाले तर 161 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पारोळा तालुक्यात 412 रुग्णांपैकी 321 रुग्ण उपचार होऊन बरे झाले आहेत तर 84 रुग्ण उपचार घेत आहेत. चाळीसगाव तालुक्यात 282 रुग्णांपैकी 122 रुग्ण बरे झाले आहेत तर 138 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात 266 रुग्णांपैकी 193 रुग्ण बरे होऊन केवळ 65 रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत. बोदवड तालुक्यात 214 रुग्णांपैकी 156 रुग्ण बरे झालेत, तर 52 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 2708 रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे चाचण्या वाढविण्यात आल्या असून वेळेत तपासणी, वेळेत निदान, वेळेत उपचार या त्रिसुत्रीनुसार आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. नागरीकांनीही स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन कोरोना सदृश्य लक्षणे जाणवत असल्यास आपली तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. नागरीकांनी जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य केल्यास जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यास निश्चित यश मिळेल असा विश्वासही जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.