नागपूर वृत्तसंस्था । नागपुर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अखेर 1 हजार खाटांच्या कोव्हिड-19 केअर सेंटरला मान्यता मिळाली आहे. सरकारने या जम्बो कोव्हिड सेंटरसाठी आदेश काढले आहेत. या सेंटरमध्ये ४०० खाटा व्हेंटिलेटर तर ३०० खाटा ऑक्सिजनच्या राहणार आहेत.
नागपुरात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. कोरोना बधितांचा आकडा ६० हजारांच्या पार गेला आहे. दररोज ५० ते ६० जणांचे कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. ही परिस्थिती असताना सरकार रुग्णांसाठी कोव्हिड केअर सेंटर उभारत नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच कानउघाडणी केली होती.
त्यामुळे सरकारने तात्काळ आदेश काढत शहरातील विभागीय क्रीडा संकुलमध्ये जम्बो कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचे आदेश काढले आहेत. या सेंटरचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी फायदा होणार आहे.
कोरोना रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन
नागपुरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना खाजगी रुग्णालयात बेड मिळत नाही. बेड मिळाला तर अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात. आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रुग्णालय सोबत रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानं समन्वय समिती स्थापन झाली आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी या समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. या समन्वय समितीमध्ये विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि आयएमएच्या अध्यक्षांचा समावेश आहे. या समन्वय समितीद्वारे खाजगी रुग्णालयांच्या अडचणी सोडवणे, सर्वसहमतीने निर्णय झाल्यास कारवाई करण्याची मुभा राहील, असं उच्च न्यायालयाने सांगीतलंय. खाजगी रुग्णालयांच्या समस्या आणि खाजगी रुग्णालयापासून रुग्णांना भेडसवणाऱ्या समस्या, सोडवण्यासाठी ही समिती गठीत केल्याची माहिती महापौर यांनी दिली आहे.