नागपूर (वृत्तसंस्था) नागपूरात आतापर्यंत कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात असलेले ९० रुग्णांची तपासणी केली असून ते निगेटिव्ह आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील सर्व उद्याने आजपासून बंद करण्यात आल्याची माहिती माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुंढे म्हणाले, नागपुरातील बिअरबार-हॉटेल्ससह उद्याने ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहेत. तर सर्व मंगल कार्यालयांना एक तर लग्नाचे बुकिंग रद्द करा किंवा लग्नात फक्त ५० लोकच असावेत, अशी अट घालण्यात आली आहे. लग्नात ५० पेक्षा जास्त लोक असल्यास मंगल कार्यालयाला जबाबदार मानले जाणार आणि त्यांच्यावर कारवाई केली जाणार, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. तसेच महापालिकेच्या हेल्पलाईनवर आतापर्यंत २५० पेक्षा जास्त कॉल आले आहेत. या लोकांना दररोज दिवसातून दोनदा विचारणा केली जाते. दहा देशातील आलेल्या २७ नागरिकांना कोरेन्टाईन करत आमदार निवासमध्ये ठेवण्यात आल्याचेही मुंढे यांनी सांगितले.