नाका बंदीवरील ड्युटीसाठी शिक्षकांसोबत खाकी वर्दीतील सहकारी द्यावा – शिक्षक संघटनेचे मागणी

धरणगाव, प्रतिनिधी ।तालुक्यात कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी तालुक्याच्या सिमावर नाकाबंदी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी माध्यमिक शिक्षकांची ड्युटी लावण्यात आलेली आहे. या शिक्षकासोबत पोलिस कॉन्स्टेबल अथवा गृहरक्षक दलाचे प्रतिनिधी कायम स्वरुपी द्यावेत तसेच शिक्षकांना आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात यावेत , कोरोना बचावाचे किट देण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नितीन कुमार देवरे, सपो नी पवन देसले ,नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना भेटून केलेली आहे.

अमळनेर तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांनी शंभरी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे प्रस्त धरणगाव तालुक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने तालुक्याची सीमा बंदी केली. धरणगाव तालुक्यात येणार जाणार नागरिकांची ,वाहनांची चौकशी करावी ,आवश्यक असेल ,परवाना असेल तरच त्यांना प्रवेश द्यावा अशी कारवाई तालुक्याच्या सीमेवर होणार यासाठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. साधारण २९ मार्चपासून पी. आर. हायस्कूल , इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नांदेड इंग्लिश स्कूल, साळवे इंग्रजी विद्यालय आदी शाळांतील शिक्षक क्रमाक्रमाने तालुक्याच्या सीमेवर नियुक्त केलेल्या ठिकाणी ड्युटी करीत आहेत. मात्र, या शिक्षकांच्या सुरक्षेकडे,आवश्यक सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बऱ्याच शिक्षकांना आपले काम काय आहे याची पण माहिती नाही. कोरोनाबाबतचे आवश्यक किट त्यांच्याकडे नाही. शिवाय पोलिस कर्मचारी अथवा गृह रक्षक दलाचे कर्मचारी कधी असतात तर कधी नसतात म्हणून किमान एक पोलिस कर्मचारी किंवा गृहरक्षक दलाचे कर्मचारी कायम स्वरुपी शिक्षकांसोबत पाहिजेत अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नितीन कुमार देवरे, पोलिस निरीक्षक पवन देसले यांना भेटून केलेली आहे. खाकी वर्दीतील माणसाला काही असले तरी नागरिक घाबरतात शिवाय शिक्षकांना शक्यतोवर रात्रीची ड्युटी देण्यात येऊ नये ,दर चार,आठ दिवसांनंतर शिक्षक बदलविण्यात यावेत असे ही कैलास माळी यांनी यावेळी नमूद केले. अतिरिक्त पोलिस कर्मचारी अथवा गृहरक्षक दलाचे कर्मचाऱ्यांची मागणी वरिष्ठांकडे करा व आमच्या शिक्षकांची सुरक्षेची काळजी घ्या. दोन दिवसापूर्वी जत तालुका डफलापुर येथील घटनेने शिक्षक घाबरलेले आहेत. प्रशासनाने सदर घटना डोळ्यासमोर ठेऊन शिक्षकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे मत माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सी. के. पाटील यांनी मांडले. तहसीलदार श्री. देवरे व पोलिस निरीक्षक श्री. देसले यांनी नांदेड फाटा,अमळनेर नाका येथे पोलिस कर्मचारी तातडीने देण्याचे मान्य केले. यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनीही शिक्षकांची बाजू प्रखरतेने मांडली. यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी ,माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सी. के.पाटील ,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष एस. एस.पाटील, टी. डी. एफ.चे अध्यक्ष डी. एस. पाटील, टी. डी. एफ. चे जिल्हा कौन्सिल सदस्य शरद कुमार बंसी, सारजाई कूडे विद्यालयाचे शिक्षक तथा पालिकेतील गटनेते कैलास माळी आदी उपस्थित होते. दरम्यान, सपोनि पवन देसले यांनी सांगितले की, तालुक्याच्या विचारात पोलिस कर्मचारी संख्या कमी आहे. पोलिस ठाणे आणि दैनंदिन कामकाजातील कर्मचारी वगळून उर्वरित कर्मचारी नेमणूक करीत असतो. आवश्यक तेथे कर्मचारी नियुक्ती लगेच केली जाईल. अतिरिक्त पोलिस कर्मचारी होमगार्ड यांची मागणी केलेली आहे. मात्र, सध्या परिस्थिती गंभीर असल्याने पोलिसांना देखील समजवून घ्या आणि सहकार्य करा आपल्याला एकत्रितपणे कोरोनाशी लढा द्यायचा आहे.

Protected Content