नांदेड : वृत्तसंस्था । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मूक आंदोलनाला नांदेडमधून सुरुवात होत आहे.
नांदेडमधून सुरु होणाऱ्या या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी आणि कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहून संभाजीराजे त्यांच्यावर संतापले . त्याचबरोबर कोरोना परिस्थितीची जाणिवही त्यांनी उपस्थितांना करून दिली.
यावेळी ते म्हणाले, सध्या कोविडची परिस्थिती पाहता आपण एवढी गर्दी करणं खरं चुकीचं आहे. पण मी तुमच्या भावना समजू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुमच्याकडे मास्क असेल तर तो लावावा. नांदेडला कोरोनाचं प्रमाण कमी असलं तरी तुम्ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. ते बोलत असतानाच कार्यकर्ते गोंधळ करत होते, घोषणा देत होते. त्यामुळे “ओ बंद करा ना, कोणी बोलू नका’ असं म्हणत संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना खडसावलं आहे.
कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे संभाजीराजेंना फारसं बोलणं शक्य झालं नाही. ते म्हणाले, “हे खऱ्या अर्थाने मूक आंदोलन होतं. मूक आंदोलनाचा हेतूच हा होता की समाज बोललाय..” मात्र कार्यकर्त्यांच्या गोंधळाला कंटाळून ते म्हणाले, “मी जाऊ का? त्यानंतर मात्र ते पुढे काही वेळ बोलले. ते म्हणाले, मूक आंदोलनाचा अर्थ हाच होता की समाज बोललाय, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही समन्वयक बोललोय, आता सरकारने बोलावं म्हणून हे आंदोलन पुकारलं होतं. मात्र ही गर्दी पाहता लोकप्रतिनिधींना बोलायला मिळेल की नाही अशी शंका वाटतेय. पण मी त्यांना जास्तीत जास्त बोलू देण्याचा प्रयत्न करेन”.