नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनबरोबर वाढत्या तणावाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला. नरेंद्र मोदी हे वास्तवात सरेंडर मोदी आहेत अशी टीप्पणी त्यांनी पंतप्रधानांवर केली आहे. एका ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी हे टीकास्त्र सोडले आहे.
जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर मोदी आहेत’ असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी भारतीय भूमी सरेंडर केली अशी टीका त्यांनी टि्वटरवर केली होती. शिवाय त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते. त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते की, जर ती जमीन चीनची होती तर, भारतीय जवान का शहीद झाले? आणि ते कोठे शहीद झाले?. दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेससह इतर अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे सुरू केले आहे.