मुक्ताईनगर प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीचे पाणी पुरवठा मुकादम भगवान वंजारी यांना नगरसेविकेचे पती बापू ससाणे यांनी धक्काबुक्की करत धमकावल्याने खळबळ उडाली असून कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
अधिक वृत्त असे की पूर्णा नदीला पूर आल्यामुळे पाणीपुरवठा मुक्ताईनगर मध्ये आणि अनियमित होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये पाणी पुरवठा दोन तास उशिराने झाला. याच कारणाचा राग येऊन नगरसेविका सौ साधना ससाणे यांचे पती बापू ससाने यांनी पाणीपुरवठा मुकादम भगवान वंजारी याना नगरपंचायत कार्यालय मध्ये येऊन धक्काबुक्की केली. आपल्या प्रभागात आता पाणी सोडल्यास हात पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. विशेष म्हणजे ही घटना पाणीपुरवठा अभियंते सोनवणे यांच्या समोर घडली.
त्यामुळे सर्व पाणीपुरवठा कर्मचार्यांनी एकत्रित येऊन नगरपालिकेचे समोर ठिय्या मांडलेला आहे. कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन करून गावातील पाणीपुरवठा बंद केलेला आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा पवित्रा आता कर्मचार्यांनी घेतलेला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोवर याबाबत तोडगा निघाला नव्हता.