जळगाव प्रतिनिधी । महापालिकेतील नगररचना विभागाच्या प्रभारी सहाय्यक संचालकपदी चंद्रकांत निकम यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तत्कालीन सहायक संचालक अनंत धामणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर जालना येथील एस. ए. पवार यांच्याकडे या खात्याचा तात्पुरता प्रभार सोपविण्यात आला होता. यानंतर डी.डी. वराडे यांच्याकडे पदभार आला होता. त्यानंतर पुन्हा वराडेंचा पदभार आणखी एका अधिकार्याकडे देण्यात आला. तथापि कायमस्वरूपी संचालक नसल्याने अनेक अडचणी निर्मा झाल्या होत्या. नवीन बांधकाम मंजुरी, ले आऊट मंजुरी, पूणत्वाचे दाखले यासारखी महत्त्वाची कामे मार्गी लागत नसल्याने सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांना त्रास सोसावा लागत होता.
याबाबत क्रेडाई या संघटनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी याची दखल घेतली आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या सहायक संचालक पदाचा पदभार आता नंदुरबार येथील सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.