सावदा, प्रतिनिधी । ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना काल सोमवार दि. ३० ऑगस्ट रोजी एका माथेफिरूने हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेचा “सावदा नगरपरिषदेचे” संपूर्ण प्रशासकीय कामकाज बंद ठेवून हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी करून निषेध व्यक्त केला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे ह्या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांची हाताची बोटे कापली गेली. तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा “संघटित निषेध” करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण नोकरशाहीसच जायबंदी करतात त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून “सावदा नगरपरिषदेचे” संपूर्ण प्रशासकीय कामकाज(अत्यावश्यक सेवा वगळून) कडकडीत रित्या बंद ठेवण्यात आले आहे. या बंदमध्ये मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सर्व विभागप्रमुख, सर्व कर्मचारी सावदा नगरपरिषद सहभागी झाले आहेत.