भडगाव प्रतिनिधी । रिक्षाच्या थांब्याजवळ लावलेल्या शेकोटीत स्प्रेच्या बाटलीचा स्फोट झाल्याने शेकोटीजवळ बसलेले पाच जणांपैकी तीन जण भाजले गेले. ही घटना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे आज सकाळी ६ वाजता घडली. तिघांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
नगरदेवळा येथील रिक्षाच्या थांब्याजवळ सकाळी थंडीचा बचाव होण्यासाठी रिक्षाचालक रिक्षाचालक किशोर वाने, भूपेंद्र राजपूत, संजय पाटील, माधव हरी पाटील, दादाभाऊ कदम यांनी जवळच असलेल्या कचरा पेटवून शेकोटी लावली. दरम्यान मोटारसायकल गॅरेजच्या बाजूस पडलेला कचरा शेकोटीत टाकला असता कागद व कचऱ्याने पेट घेतला, परंतु कचऱ्यामध्ये असलेल्या ब्लॅक कलरच्या स्प्रे पंपाचा स्फोट झाला. किशोर वाने, भूपेंद्र राजपूत, संजय पाटील यांच्या चेहऱ्यावर भाजले गेले. जखमींना नगरदेवळा येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. भूपेंद्र राजपूत यांना चाळीसगाव येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे.