पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथील रावसाहेब राऊळ यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समितीतर्फे राजमाता जिजाऊ हा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते देण्यात आला आहे.
हा पुरस्कार माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अधिकारी प्रतापराव दिघावकर, अंधश्रद्धा निर्मुलन वैज्ञानिक दृष्टीकोन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष रंजन खरोटे यांच्या हस्ते नुकताच मालेगांव जि. नाशिक येथील समारंभात प्रदान करण्यात आला.
यावेळी मालेगावच्या माजी महापौर ज्योती भोसले, मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील, राजेंद्र भोसले, डाॅ. तुषार शेवाळे, विजया मानमोडे, निलेश कचरे, अनिल पाटील, रविंद्र अहिरे, अमोल निकम सह मान्यवर उपस्थित होते. रावसाहेब राऊळ हे शिक्षक व लेखक असून त्यांनी संशोधन केलेल्या तलासरी पँटर्न ऑफ इंग्लिश या नविन अध्ययन पद्धतीला अनेक शासकीय व सामाजिक संस्थांकडून व अनेक वृत्तपत्रांमध्ये गौरव प्राप्त झाला आहे. तसेच गोल्डन टच टेक्निक्स ह्या इंस्टंट इंग्लिश पद्धतीने ते सोशल मीडिया मार्फत राज्यातील शेकडो शिक्षकांना इंग्लिश स्पिकिंगचे प्रशिक्षण देत असतात. ब्रिटिश कौंशिल व एस. सी. ई. आर. टी. या संस्थांकडून निवड झालेली असल्याने गेल्या ५ वर्षांपासून ते पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना स्पोकन इंग्लिश चे ट्रेनिंग देण्याचे कामही करीत असून नाचत गात पाढे ह्या आनंददायी पाढे पाठांतर पद्धतीचे ते जनक म्हणून ही ओळखले जातात.
अगदी कमी कालावधीत संपूर्ण सोशल मीडियावर तुफानी व्हायरल झालेला व अनेक न्यूज चॅनल्सवर झळकलेला उपक्रम म्हणून नाचत गात पाढे या उपक्रमास स्थान मिळाले असून रावसाहेब राऊळ यांचे शून्याची गोष्ट, पाथ फाईंडर, बेसबूक इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. रावसाहेब राऊळ यांच्या सार्थ निवडीबद्दल सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.