पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा येथील उपसरपंच विलास राजाराम पाटील (भामरे) यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले म्हणून नाशिक विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांचा निकाल कायम ठेवत अपात्र ठरविले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विलास राजाराम पाटील यांनी प्रभाग क्रं. २ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्याविरुद्ध दिपक परदेशी यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे २ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम 1१४ (ज-३) अन्वये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यात दिलेल्या सर्व पुराव्यांची तपासणी करीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. २२ जुन २१ रोजी त्यांना अपात्र घोषित केले होते.
त्या निकाल विरोधात विलास पाटील यांनी नासिक विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिल २४/२०२१ दाखल केले होते. त्यावर विभागीय आयुक्त यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करत शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी यांनी केलेली आपात्रतेची कार्यवाही योग्य व कायदेशीर आहे असा निष्कर्ष काढला. विलास पाटील यांनी बचावासाठी केलेले अपिल आयुक्तांनी फेटाळले असून जिल्हाधिकारी यांचा अपात्रतेचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून इतर नऊ अतिक्रमण तक्रारी धारक सदस्यांचे धाबे दणाणले आहे. तक्रारदारतर्फे पाचोरा येथील अॅड. प्रल्हाद बी. पाटील यांनी कामकाज पाहिले.