Home पर्यावरण धुळपिंप्रीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासह ‘माझं गाव, माझं अभियान’ अन् वृक्षारोपणाचा संदेश

धुळपिंप्रीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासह ‘माझं गाव, माझं अभियान’ अन् वृक्षारोपणाचा संदेश

0
7

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील धुळपिंप्री येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. यासोबतच ‘माझं गाव, माझं अभियान – आपलं धुळपिंप्री’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात, नामफलकांचे वितरण आणि वृक्षारोपण करण्यात आल्याने यंदाचा स्वातंत्र्यदिन ग्रामस्थांसाठी विशेष ठरला.

ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच निंबा बाबुलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील आदर्श शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दौलत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद, आशा सेविका, आरोग्य सेवक, विविध विभागांचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळेतही सरपंच निंबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. गावातील सामान्य नागरिक दत्तू रावण जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिवाकर आधार पाटील, कैलास आप्पा जगताप, उपसरपंच सुरेश साहेबराव पाटील, राजेंद्र दौलत पाटील, अविनाश अशोक पाटील, सुधाकर पाटील, अविनाश पाटील, पन्हाळकर आप्पा, रमेश कोतवाल यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून धुळपिंप्री गावात ‘माझं गाव, माझं अभियान – आपलं धुळपिंप्री’ या संकल्पनेअंतर्गत विशेष उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातून गावाबद्दलची आपुलकी, स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्याचा संदेश देण्यात आला. नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या गावातील नवतरुण निशान सोमा पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नामफलकांचे नागरिकांना वितरण करण्यात आले.

गावाच्या विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आपल्या गावाची ओळख जपतानाच गाव अधिक स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गोरख रामदास पाटील, राजू आप्पा, कौतिक माणिक पाटील, सुरेश गना पाटील, भागवत गुलाब पाटील, रविंद्र हरी पाटील, भैया भाऊ, बापू देवसिंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Protected Content

Play sound