जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने वरखेडी येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इजास रसूल काकर (वय-२७) रा. वरखेडी ता.पाचोरा असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इजास रसूल काकर हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. भांडे विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी ४ मार्च रोजी दुपारी सुरत जाण्यासाठी इजास हा पाचोरा येथून जळगावला येण्यासाठी मेमूट्रेनने बसला होता. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरसोली ते जळगाव रेल्वे रूळदरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यावेळी जळगाव रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यांच्याजवळील मोबाईलच्या आधारे ओळख पटली. इजास रसूल काकर हे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. रविवारी ५ मार्च रोजी शविविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई जुबेदाबी, पत्नी रिजवानाबी, ८ महिन्याची मुलगी उमेन व भाऊ अरबाज असा परिवार आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन भावसार करीत आहे.