धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृध्द महिलेचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील वृध्द महिलेचा धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कैसाबाई मंगा भोई (वय-६५) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे.

नशिराबाद पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कैसाबाई भोई या नशिराबाद येथील भोईवाडा येथे भावाच्या घरी वास्तव्याला होत्या. त्याचा भाऊ मयत झाल्याने त्यांचा भाचा अनिल झगडू भोई हे त्यांचा संभाळ करत होते. रविवारी २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कैसाबाई भोई ह्या जळगाव ते भादली अप लाईन रेल्वे रूळावरील रेल्वे खंबा क्रमांक ४२६/१६ ते १४ दरम्यान वरून जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात रेल्वेगाडी चालकाने जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना माहिती दिली. त्यानंतर घटनेची माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याला देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. सोमवारी ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

Protected Content