धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । खंडेराव नगरातील तरूणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

योगेश गुलाब गायकवाड (वय ३२,रा.खंडेराव नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश याची पत्नी काही दिवसापासून माहेरी गेलेली आहे. मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता भाऊ भारत हा कामावरुन घरी आला तेव्हा योगेश घराबाहेर पडला. जाताना कुठे चाललो, काय काम आहे याबाबत त्याने कोणालाच काही सांगितले नाही. हरिविठ्ठल नगर परिसरातील लोखंडी पूलावर खांबा क्रमांक १४६/२० येथे रात्री ११ वाजता एका तरुणाने धावत्या रेल्वेसमोर झोकून दिल्याची माहिती रेल्वेकडून मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सुशील चौधरी व प्रवीण जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. खिशातील कागदपत्रे व नातेवाईकाकडून शोध घेतला जात असतानाच त्याची ओळख पटली. योगेश हा मनपाच्या मलेरिया विभागात कार्यरत होता. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे.  दरम्यान, योगेश याच्या पश्चात पत्नी डिंपल, मुलगा कुणाल (वय ११), पवन (६), आई सिंधूबाई, भाऊ भारत व अनिल असा परिवार आहे. 

Protected Content