जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेखाली आल्याने दिनकर नगरातील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नारायण शरद पवार (वय-२६) रा. दिनकर नगर, जळगाव असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शनिपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नारायण पवार हा आई-वडील आणि बहीण यांच्यासह वास्तव्याला होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो नाशिक येथील मेडिकल दुकानावर नोकरीला होता. दोन दिवसापूर्वीच तो जळगाव शहरात आई-वडील व बहिणीला भेटण्यासाठी आलेला होता. मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रात्री ८ वाजता चौकातून जाऊन येतो असे आईला सांगून घराबाहे पडला. त्यानंतर तो रात्री घरी आला नाही. दरम्यान रात्री १० वाजेच्या सुमारास जळगाव-आसोदा दरम्यानच्या रेल्वे रुळावर अपलाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२२-१६ रेल्वे रूळ क्रॉस करत असतांना धावत्या रेल्वेखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर खिश्यातील कागदपत्रांच्या आधारे मयताची ओळख पटली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद गंगावणे यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. खाजगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई अनिता, बहीण पूनम आणि वडील शरद रामदास पवार असा परिवार आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.