यावल, प्रतिनिधी । कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्य वेळेवर मिळावे म्हणून नागरी पुरवठा विभाग कार्यतत्पर झाले असून फैजपूर विभागाचे प्रांतअधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुवर व स्थानिक मंडळ अधिकारी यांनी यावल तालुक्यातील दोन गावांमधील स्वस्त धान्य दुकानदारांच्या धान्य वाटपात गैरप्रकार आढळून आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, फैजपूर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भालोद तालुका यावल येथील बळीराम एम. चौधरी यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ७४ यांच्या दुकानात उपस्थिती ग्राहकांना धान्य दुकानदार यांनी किती धान्य वाटप केले आहे याची तपासणी करण्यासाठी गेले असता संबंधित दुकानदार हा ग्राहकांना शासनाने ठरवलेल्या पेक्षा कमी धान्य देत असल्याचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, याठिकाणी तहसीलदार जितेंद्र कुवर, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, यावल तहसीलचे पुरवठा विभाग अव्वल कारकून राजेंद्र भंगाळे यांनी ग्राहकांना देण्यात आलेल्या धान्याची तपासणी करून त्यांचे जबाब घेतले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील अकलूज येथील राजू गिरधर कोळी यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक ८९ येथे तपासणी केली असता त्यांनी कोणतेही धान्य ग्राहकांना वाटप केले नसल्याचे स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य मिळाले नसल्याने बामनोदचे मंडळाधिकारी बी. एम. पवार यांनी फैजपुर पोलीस स्टेशनला संबंधित दुकानदारांच्या विरुद्ध तक्रार केल्याने गुन्हा दाखल केला आहे.