धानवड येथे जुन्या वादातून कुटुंबाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

जळगाव,प्रतिनिधी | पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून तालुक्यातील धानवड येथील एका कुटुंबातील चार जणांना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करणारे संशयित आरोपी अरूण मधुकर पाटील (वय-४५) आणि गोलु उर्फ मनिष अरूण पाटील (वय-२२) दोन्हा रा. धानवड ता. जि.जळगाव यांना एमआयडीसी पोलीसात बुधवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी अटक केली. या गुन्ह्यात एकुण ४ जणांवर गुन्हा दाखल आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानवड येथील रहिवाशी अशोक पंडीत पाटील (वय-५३) हे पत्नी, मुलगा व सुन यांच्यासह राहतात. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा राजेंद्र अशोक पाटील यांचा आणि गावातील अरूण मधुकर पाटील यांच्या जुना वाद असल्याने राजेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात यापुर्वी तक्रार दिली होती. पोलीसात तक्रार दिल्याचा राग अरूण पाटील याला आल्याने ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अशोक पाटील हे कुटुंबियांसह घरात असतांना अरूण मधुकर पाटील, जयवंताबाई मधुकर पाटील, गोलू अरूण पाटील आणि पप्पू अरूण पाटील सर्व रा. धानवड हे अनधिकृतपणे घरात प्रवेश करून आले. त्यांनी हातात आलेल्या लांकडी दांडके व कुऱ्हाडीच्या दांडक्याने अशोक पाटील, मुलगा राजेंद्र पाटील, पत्नी निर्मलाबाई अशोक पाटील आणि सुन राजश्री राजेंद्र पाटील यांना बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून अरूण पाटील, जयवंताबाई पाटील, पप्पू पाटील आणि गोलू पाटील यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अरूण पाटील व त्याचा मुलगा गोलू पाटील यांना बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ धानवड येथून अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.

Protected Content