जयपूर : वृत्तसंस्था । राजस्थानातं लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी घरामध्ये शिरण्याआधीच तहसीलदाराला माहिती मिळाल्याने त्याने स्वत:ला घरात कोंडून घेत स्टोव्हवर २० लाख रुपयांच्या नोटा जाळल्या.
सिरोही जिल्ह्यातील पिंडवाडा तहसीलमधील जमीन अभिलेख निरीक्षक परबत सिंहला एक लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाला आधी यश आलं. त्यानंतर आरोपी तहसीलदाराला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची टीम पोहचली त्याने स्वत:ला कोंडून घेतलं. बुधवारी रात्री या नाट्यमय घडामोडी घडल्या.
तहसीलदार कल्पेश कुमार जैन असं या तहसीलदाराचं नाव आहे. एका कंत्राटदाराकडून सरकारी कंत्राट देण्याच्या नावाखाली कल्पेशने लाच मागितल्याचा खुलासा त्यांच्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या परबत सिंहने केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक बीएल सोनी यांनी दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाने परबत सिंहच्या माहितीनुसार तहसीलदाराच्या निवासस्थानी छापा टाकला तेव्हा घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या लावून कल्पेशने स्वत:ला कोंडून घेतलं. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांना घरात प्रवेश करता आला नाही. हे अधिकारी घराबाहेरुन कल्पेशला दरवाजा उघडण्यास सांगत असतानाच त्याने घरामध्ये १५ ते २० लाखांच्या नोटा जाळल्या.
बऱ्याच प्रयत्नानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी या घरात घुसले तेव्हा त्यांना किचनमध्ये जाळलेल्या नोटा आणि दीड लाख रुपये रोख रक्कम मिळाली. कल्पेश आणि परबत सिंह दोघांनाही अटक करण्यात आली आहे अशी माहिती सोनी यांनी दिलीय.