धरणगाव, प्रतिनिधी | येथे सध्या गावात फिरणाऱ्या अनेक भटक्या कुत्र्यांवर खरुज रोगाने थैमान घातले आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागण होण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. तरी संबंधित पशुवैद्यकिय विभागाकडून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
याबाबत असे की, येथील गावात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर सध्या खरुज प्रकारचा रोग आलेला असून या कुत्र्यांचे अंगावरील संपूर्ण केस गळणे, रंग गुलाबी पडणे असा प्रकार दिसून येत आहे. भररस्त्यात हे कुत्रे अंग खाजवित असतात. त्यामुळे काही कुत्रे तर अंगाला नियमित खाज येत असल्याने व अति खाजेमुळे या कुत्र्यांच्या अंगावरील भाग सडत असल्याने पिसाळत सुद्धा आहे. गावातील मुख्य रस्त्यावर भागात अनेक कुत्रे व त्यांची पिल्ले यांना या रोगाची लागण झालेली असून ते नागरिकांच्या गर्दीतून वावरत असतात. तसेच गावातील इतरही भागात असेच खाज रोगाची लागण लागलेले कुत्रे आहेत. खाजेमुळे पिसाळलेल्या कुत्र्यांकडून नागरिकांना तसेच लहान मुलांना चावण्याच्या घटना याअगोदर घडलेल्या असून तसेच यानंतर घडू शकतात. तसेच या रोगी कुत्र्यांमुळे इतरही प्राण्यांना तसेच नागरिकांना या संसर्गजन्य खाज रोगाची लागण होऊ शकते. व त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तरी या गंभीर समस्येवर संबंधित नगरपालिका पशु वैद्यकीय विभागाने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.