जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता संपूर्ण जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मेळाव्यांचे तालुकानिहाय आयोजन करण्यात येत आहे. सोमवार, दि 17 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगाव येथे तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांबाबत तसेच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतंर्गत स्वयंरोजगारासाठी तसेच लघु उद्योगासाठी त्याचबरोबर आपला व्यवसाय वृध्दीगंत करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणेबाबत विविध शासकीय विभागांचे व बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉलही लावण्यात येणार आहे. या मेळाव्यास तालुक्यातील बेरोजगार युवकांनी तसेच लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
याचप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असून त्याच्या तारखा व ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. एरंडोल येथे 18 फेब्रुवारी रोजी नविन पोलिस स्टेशन मैदान, धरणगाव चौफुली येथे, पारोळा 24 फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे, अमळनेर 25 फेब्रुवारी रोजी साने गुरुजी विद्यालय, धुळेरोड, चोपडा 27 फेब्रुवारी रोजी पंकज महाविद्यालय, बोरोले नगर न. 1 यावल रोड येथे, यावल तालुक्याचा मेळावा 28 फेब्रुवारी रोजी तापी व्हॅली एज्यूकेशन सोसायटीचे धनाजी नाना महाविद्यालय. फैजपूर येथे, रावेर 29 फेब्रुवारी रोजी विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय येथे, तसेच मुक्ताईनगर 2 मार्च रोजी संत मुक्ताई कला व वाणिज्य महाविद्यालय येथे तर भुसावळ 4 मार्च रोजी बियाणी पब्लीक स्कुल, भिरुड हॉस्पिटलजवळ याठिकाणी तसेच बोदवड 6 मार्च रोजी बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे तर जामनेर 11 मार्च रोजी सोना इस्टेट मैदान, भुसावळ रोड, जामनेर येथे, तसेच पाचोरा 12 मार्च रोजी मानसिंगा मैदान, शिवाजी चौक येथे तसेच भडगाव 13 मार्च रेाजी शेतकरी सहकारी संघ, पाचोरा रोड याठिकाणी तर चाळीसगाव 16 मार्च, 2020 रोजी वाय. एन. चव्हाण आर्टस, सायन्स, कॉमर्स महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव याठिकाणी होणार असून सर्व मेळाव्यांची वेळ ही सकाळी 10 वाजता राहणार आहे.
या मेळाव्यांना जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांसह ज्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्ज मागणी केलेली अशा अशा व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.