धरणगाव प्रतिनिधी । शहरातील पारधी वाडा परिसरात कोरोना सदृश्य व्याधीने मृत झालेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असून मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, धरणगाव शहरातील पारधीवाडा परिसरातील एकाचा कोरोना सदृश्य व्याधीने मृत्यू झाला होता. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्या मयत व्यक्तीचे स्वॅब सँपल घेऊन चाचणीसाठी धुळे येथे पाठविले होते. तर मृताच्या संपर्कात आलेल्या दोन जणांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. दरम्यान, आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये मयत व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेचा जीव भांड्यात पडला आहे. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.