धरणगाव प्रतिनिधी । येथे कोरोना बाधीत असल्याचे आढळून आलेल्या महिलेच्या संपर्कातील १७ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब सँपल्स घेण्यात आले आहेत.
याबाबत वृत्त असे की, धरणगाव शहरातील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती काल रात्री समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. संबंधीत महिलेचा निवास असणारा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने धरणगाव येथे बैठक घेऊन कोरोनाला प्रतिकार करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, संबंधीत कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या १७ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांना धरणगाव येथील अधिग्रहीत करण्यात आलेल्या वसतीगृहात ठेवण्यात आले आहेत. त्यांचे स्वॅब सँपल घेण्यात आले असून ते धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे.