लातूर (वृत्तसंस्था) एका भोंदूबाबाने दिलेला लिंबू आणि कुंकूचा प्रसाद खाल्ल्याने तब्बल २० जणांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे.
औसा तालुक्यातील सारोळा गावात देवीची परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गावातील काही लोकं एका आराद्याकडे गेले होते. परंतू हा आरादी गावातील एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला होता. आरादीने लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारून हा प्रसाद गावातील अनेकांना खायला दिला. दोन दिवसानंतर आजारी पडलेल्या आराद्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यातील तब्बल २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे सारोळ्याच्या पोलीस पाटील यांनी औसा पोलीस ठाण्यात त्या भोंदूबाबाविरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लातूरमध्ये आतापर्यंत ४९३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत २५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या लातूरमध्ये २१४ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे.