यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील दोन भावंडे कालपासून बेपत्ता झाले होते. आज गुरूवारी दुपारी दोन्ही भावंडांचा त्यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान परिसरात रवींद्र मधुकर सावळे (वय-३५) आणि उज्ज्वला सावळे हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना रितेश आणि हितेश ही अनुक्रमे चार आणि तीन वर्षांची मुले आहेत. काल बुधवारी आपल्या आई-वडिलांच्या सोबत ही दोन्ही मुले स्वत:च्या चुंचाळे शिवारातील शेत गट नं. ३६५/१ मधील शेतात गेली होती. सावळे दाम्पत्य शेतात काम करत असतांना ही दोन्ही मुले खेळत असल्याने कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. यात दोन्ही मुले बेपत्ता झाले होते. चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा शोध घेण्यात आला परंतू ते कुठेही आढळून आले नाही. याबाबत यावल पोलीसात रात्री उशीरा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच शेतातील विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याचे खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी विहिरीजवळ प्रचंड आक्रोश केला होता. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोउनि जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान मयत झालेल्या बालकांचा चुलत काका हा मनोरूग्ण असल्याने त्यानेच विहिरीत मुलांना फेकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे चुलत काकाला चौकशीसाठी यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शेतातील विहिरीजवळ चिंचोली गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी जमली होती.