पतियाळा (वृत्तसंस्था) लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्याने कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने हात पूर्णपणे कापल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील घडली आहे. आज रविवारी सकाळी भाजी बाजाराच्या मुख्य गेटवर शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात इतरही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पंजाबमधील स्थिती कोरोनामुळे गंभीर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गर्दी थांबवण्यासाठी कायद्याची कडक भूमिका घेत अमलबजावणी सुरू केली. निहंगांचा एक गट एका पांढऱ्या गाडीतून पटियालातील भाजी मंडईमध्ये जात होते. यावेळी लॉकडाउन असल्याने बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्फ्यू पास दाखवण्याची मागणी केली. त्यावर निहंगांच्या गटाने गाडी थेट भाजी मंडईच्या रस्त्यावर असलेले बॅरिकेट्स तोडले आणि पुढे निघून गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निहंगांच्या टोळक्याने पोलिसांवरच हल्ला केला. त्यात त्यांनी हरजीत सिंग नामक सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा हात कापला. या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याशिवाय बाजाराच्या बोर्डाचे अधिकारीही जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ७ लोकांना ताब्यात घेतले आहे. हरजीत सिंग यांना चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे.