चंदीगड (वृत्तसंस्था) कोरोनाचे तब्बल १६७ संशयित रुग्ण बेपत्ता झाल्यामुळे पंजाबमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या रुग्णांच्या शोधार्थ पोलीस आणि आरोग्य प्रशासनाचे पथक कामाला लागली आहेत.
बेपत्ता कोरोना संशयित १६७ रुग्ण नुकतेच परदेश दौऱ्यावरुन परतले होते. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कोरोना संशयितांची यादी दिली होती. आता आरोग्य विभाग या बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. यातील २९ लोकांचा तपास लागला असून उर्वरित ११९ लोकांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२ लोकांना शोधून काढले आहे. तर आरोग्य विभागावर ७७ लोकांना शोधून काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आरोग्य विभागानेही १७ संशयितांना शोधून काढल्याचे वृत्त आहे. लुधियानामधील बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. पासपोर्टमधील नाव, पत्ता आणि नंबर खोटे असल्यामुळे आतापर्यंत संशयितांची माहिती मिळत नसल्याचे बोलले जात आहे.