धक्कादायक : ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात चोरी !

जुन्नर (वृत्तसंस्था) महाराष्ट्रासह देशभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरातून चांदीची छत्री आणि दानपेटी चोरीला गेली आहे.

 

सोमवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली. मंदिरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये दोन धष्ट पुष्ट व्यक्तींनी मंदिरात प्रवेश केल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या हातात हातात गलोरी व कटावणीसारखे लोखंडी हत्यारे दिसत आहे. १७ मार्चपासून मंदिर बंद असून या घटनेत सुमारे रोख रकमेसहित ८० ते ९० हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात मंदिर बंद राहणार असल्याने खबरदारी म्हणून लॉकडाऊन होण्यापूर्वी देवस्थानने अगोदरच श्रींचे सर्व सुवर्णालंकार बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले होते. तसेच लॉकडाऊनपूर्वी तिजोरी उघडून त्यामध्ये असणारी रक्कम बँक खात्यात वर्ग केल्यामुळे या घटनेत मोठा आर्थिक अनर्थ टळला आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नहर हा सातवा गणपती आहे. विघ्नहर म्हणजे भक्तांचे विघ्न दूर करणारा अशी या गणरायाची ओळख आहे. तसंच अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नहरला ओळखले जाते.

Protected Content