द्वारकाई व्याख्यानमाला खान्देशातील सांस्कृतिक मानदंड

भुसावळ, प्रतिनिधी  ।  ‘अाई जग दावणारी अाई हंबरणारी गाय, शिळपाख खाऊनही देई लेकरांना साय’, ‘बाळा मला भूक नाही असं अाई म्हणायची, अामच्या टाेपल्यात तव्हा अर्धी भाकर असायची’ अशा काळजाला भिडणाऱ्या स्वरचित गेय कविता सादर करून पुण्याचे ‘गदिमा’ पुरस्कारप्राप्त कवी देवा झिंजाड यांनी रसिकांच्या डाेळ्यात अासवांचं गाेकुळ उभं केलं. भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशन अायाेजित अाॅनलाइन द्वारकाई व्याख्यानमालेत त्यांनी कविता सादर केल्या. द्वारकाई व्याख्यानमाला खान्देशातील सांस्कृतिक मानदंड असल्याचे गाैरवाेद‌्गारही त्यांनी काढले. 

 

माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या माताेश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणाऱ्या या अाॅनलाइन व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प कवी झिंजाड यांनी ‘अाई-बापाच्या कविता’ या विषयावर रविवारी गुंफले. ‘द्वारकाई व्याख्यानमाला ही खान्देशातील सांस्कृतिक मानदंड अाहे. मानवी मनाची सांस्कृतिक मशागत, मेंदू नांगरण्याचे शाश्वत काम या चळवळीच्या माध्यमातून हाेते अाहे. जन्मदात्री मातेचे स्मरण करण्यासाठी पेटवलेला हा ललामभूत संस्कारयज्ञ समाजाला दिशा देणारा अाहे, अशी भावना त्यांनी सुरुवातीला व्यक्त केली. त्यानंतर स्वरचित अाठ ते दहा कविता व त्यांचा अाशय संक्षिप्त स्वरुपात उलगडून सांगितला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरीक बापू मांडळकर हे हाेते. प्रास्ताविक उमेश नेमाडे यांनी केले. स्व. अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला सुरू असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी केले. तंत्रसहाय्य पुणे बालभारतीचे सदस्य डाॅ. जगदीश पाटील व काेटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. गिरीश काेळी यांचे लाभले. यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे पदाधिकारी व नियाेजन समितीने परिश्रम घेतले.

कवितांना संघर्ष, वास्तवाचा सुगंध

कवी देवा झिंजाड यांनी ‘ऋण अाईच्या गर्भाचं ह्या जन्मीच फेडावं, अाई-बापाच्या सावलीत हिरव्या काेंबानं वाढावं’ ही कविता सर्वप्रथम सादर केली. त्यानंतर ‘वाटण्या’ कविता खर्जातील अार्जवात म्हटली. ‘एक अाईवर गेला एक बापावर गेला, वाटणीच्या टाइमाला लेक बायकाेवर गेला’ या अाेळीतून त्यांनी अाई-बापांच्या नशिबी अायुष्याच्या सायंकाळी अालेली वेदना मांडली. एकंदरीत त्यांच्या सर्व कविता या सभाेवतालचं कष्टकरी समाजाचं जगणं, भाेगण्याचं वास्तव व संघर्ष मांडणाऱ्या अशाच हाेत्या.

 

‘फुलं’ कवितेने डाेळ्यात अाणलं पाणी

सासूरवास हाेणारी लेक अापल्या दूरदेशी असलेल्या अाईला पत्र पाठवून अंतर्मनाच्या भावना कशी व्यक्त करते? हे त्यांनी ‘फुलं’ या कवितेतून मांडले. ‘मंुंडावळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला गं अाई, त्यानंतर फुलांशी माझं नातं तुटले गं अाई’ या अाेळी एेकताना अाॅनलाइन रसिकांच्या माेबाइलचे स्क्रीन व हातरुमालाच्या घड्या अासवांनी अाेल्या झाल्या नसतील तरच नवल. अायुष्याची अखेरची घटका माेजणाऱ्या अाईवरची कविता सादर करताना कवी झिंजाड यांचा हुंदका दाटून अाला.

चंदनशिवे उद्या द्वितीय पुष्प गुंफणार

द्वारकाई व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प मंगळवारी (२७ जुलै) सकाळी १०.३० वाजता कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथील दंगलकार नितीन चंदनशिवे हे गुंफतील. ‘वेदनेचा तळ शाेधणारी कविता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय अाहे.

 

Protected Content