कानपूर: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दोन मैत्रिणींनी कुटुंबीयांचा विरोध झुगारून एकमेकींशी लग्न केलं. त्यानंतर दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन जोरदार गोंधळ घातला. तिथे मुलींनी कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार दिला. दोघींनी मंदिरात लग्न केलं आणि भाड्याच्या घरात जाऊन राहू लागल्या. या ‘अजब प्रेमाची…’ कानपूरमध्ये जोरदार चर्चा आहे.
आम्ही दोघी सुजाण आहोत आणि मर्जीने लग्न करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. एका मुलीच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलीवर आरोप केला आहे. फूस लावून किर्तीने आमच्या मुलीला सोबत नेले. तिला घरातून रोकड आणि दागिने घेऊन यायला सांगितले, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस चौकशी करत आहेत.
बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किर्ती तिवारी आणि शेजारी राहणाऱ्या मुलीचे एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघींच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल माहीत होते. मात्र, कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. किर्तीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न २३ जानेवारी २०१९ रोजी बर्रा सात येथे राहणाऱ्या शंकर शुक्ला याच्याशी लावून दिले. पती दारूच्या नशेत येऊन दररोज मारहाण करतो, असा आरोप किर्तीने केला आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१९ मध्ये पतीचे घर सोडून ती माहेरी राहायला आली.
किर्ती आणि मुलीने सांगितले की, २५ ऑगस्ट रोजी दोघींनी बिठूरच्या एका मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर दोघीही आपापल्या घरी राहू लागल्या. गेल्या २३ सप्टेंबरला त्या घरातून पळून गेल्या आणि एकत्र राहू लागल्या. आता आम्ही दोघी वेगळ्या राहू शकत नाही. वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर, दोघीही आत्महत्या करू, असे त्यांनी सांगितले. आम्हाला मुले आवडत नाहीत. माझ्या कुटुंबीयांनी माझे लग्न लावून दिले होते. पती मारहाण करत होता. त्यामुळे मुलांविषयी मनात राग निर्माण झाला आहे, असे किर्तीने सांगितले.