श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमधील पूंछमधील दुर्गन पोशाणा भागात दुपारपासून सुरू झालेल्या चकमकीत, दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दहशतवाद्यांच्या एका सहकाऱ्यास अटकही करण्यात आली आहे.
पूंछमध्ये तीन दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्याने चकमकीस सुरूवात झाली होती.
सुरूवातीस जवानांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मात्र, दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरूच ठेवण्यात आल्याने अखेर जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला व एकास अटक केली.
या अगोदर पूंछ जिल्ह्य़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) एक उपनिरीक्षक शहीद झाले होते.