दोन डोसमधलं अंतर वाढवल्याने नकारात्मक परिणाम नाही – डॉ. फौची

 

 

 वाशिंग्टन : वृत्तसंस्था । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी  भारतात  कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवल्याने नकारात्मक परिणाम होणार नाही , असं म्हटलं आहे

 

सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी त्यावर  भूमिका मांडली आहे. “भारतानं कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधलं अंतर वाढवण्याचा घेतलेला निर्णय वाजवी आहे”, असं डॉ. फौची म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतातील  परिस्थितीच्या हाताळणीवर फौची यांनी परखडपणे भूमिका मांडली होती. मात्र, आता फौची यांनी भारत सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्यासाठी कारणं देखील दिली आहेत. तसेच, येत्या काळात भारतानं कोणत्या प्रकारे पावलं उचलायला हवीत, यावर देखील डॉ. फौची यांनी सल्ला दिला आहे.

 

 

कोविशिल्ड लसीच्या डोसमधलं अंतर वाढवण्याच्या निर्णयाचा फौची यांनी लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला आहे. “जेव्हा तुम्ही भारतासारख्या कठीण परिस्थितीत असता, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे मार्ग शोधावे लागतात. त्यामुळे मला वाटतं की दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा भारत सरकारचा निर्णय वाजवी आहे”, असं ते म्हणाले आहेत.  “डोसमधलं अंतर वाढवल्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर कोणताही परिणाम होत नाही”, असं देखील डॉ. फौची म्हणाले आहेत.

 

Protected Content