मुंबई : वृत्तसंस्था । गेल्या दोन आठवड्यांत कोरोना संसर्ग झालेल्या २६ पोलीस अधिकारी, अमलदारांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयातून देण्यात आली. गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत ३९० पोलीस कोरोनाने मृत्युमुखी पडले.
संसर्ग पसरू नये यासाठी प्राधान्याने पोलीस दलात लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र लसीकरणाचा पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यातच दुसरी लाट थोपवण्यासाठी लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधांच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर आली.
ही जबाबदारी पेलताना पोलीस दलातील संसर्ग प्रसार आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वर्षभरात राज्य पोलीस दलातील ३४ हजार ५८७ अधिकारी अंमलदार बाधित झाले. सध्या ३ हजार ७०० जण उपचार घेत आहेत.
मुंबई पोलीस दलातील ८ हजार ३७२ अधिकारी, अंमलदार बाधित झाले आहेत. त्यापैकी ७ हजार ५९८ जणांनी कोरोनावर मात केली. यातील बहुसंख्य अधिकारी कामावर रुजू झाले आहेत.