नवी दिल्ली : वृत्तसंस्था । जगभरातून इशारा दिला जात असतानाच आपण बेजबाबदार वागत राहिलो तर ९७ टक्के भारतीयांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय.

काँग्रसेचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना परिस्थितीवरुन केंद्रातील मोदी सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींचा उल्लेख राहुल यांनी इव्हेंट मॅनेजर असा करत त्यांना साऱ्या गोष्टी केवळ इव्हेंट वाटतात असा टोला लगावला आहे.
केंद्र सरकारला अनेकदा कोरोनासंदर्भात इशारा दिल्यानंतरही त्यांनी उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप राहुल यांनी केला. आजही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्यासाठी अनेक ठिकाणी केंद्राने आपल्या धोरणांच्या माध्यमातून विषाणूला प्रवेश देण्यासाठी दारं उघडी ठेवल्याचा आरोप राहुल यांनी केलाय.
पपराष्ट्रमंत्री जयशंकर हे व्हॅक्सिन डिप्लोमसीसंदर्भात बोलत असल्याचा मुद्दा घेऊन राहुल यांनी देशातील लसीकरण शिल्लक असताना इतर देशांना लसपुरवठा करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नाटकं करत राहिले आणि त्यांच्या बेजबाबदार वागण्यानेच दुसरी लाट आली. त्यांनी कोरोना समजूनच घेतला नाही. भारतामधील मृत्यूदराचे आकडे खोटे आहेत. सरकारने खरं बोललं पाहिजे. या विषाणूमध्ये बदल घडतोय हे समजून घ्या. जगभरातून आपल्याला सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय. आपल्या देशातील ३ टक्के जनतेचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यामुळे अजूनही आपल्या देशातील ९७ टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो,” असं राहुल म्हणाले.
“मोठी अचडण ही आहे की लसीकरणासंदर्भातील काही धोरण नाहीय. पंतप्रधान धोरणात्मक विचार करत नाहीत. ते इव्हेंट मॅनेजर आहेत. ते एका वेळेस एकाच इव्हेंटचा विचार करतात. त्यांना काही हवं असेल तर अचानक एखादा मोठा इव्हेंट करतात. सध्या आपल्याला इव्हेंट्सची गरज नाही. अशा इव्हेंट्सने लोकांचे प्राण जातील त्यामुळेच आपल्याला सध्या धोरणं हवी आहेत. या धोरणांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार रोखला पाहिजे. तुम्ही त्या विषाणूला पसरण्यासाठी जेवढा वेळ आणि जागा द्याल तेवढा तो घातक होत जाईल,” असं राहुल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
मोदींनी केलेली नौटंकी आणि बेजबाबदार वागणुकीमुळेच दुसरी लाट आली. याच गतीने लसीकरण सुरु राहिलं तर देशातील सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी २०२४ चा मे महिना उजाडेल, असंही राहुल यांनी म्हटलं आहे. “केंद्र सरकारने आपली काम करण्याची पद्धत बदलावी. या पद्धतीमुळेच लाखो लोकांचा जीव गेलाय,” अशी टीकाही राहुल यांनी केली.