नवी दिल्ली वृत्तसंस्था । करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील प्रवासी वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. देशातील करोनाच्या रुग्णांच्या संख्या सतत वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील कोरनाच्या रुग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे.
केंद्र सरकारने करोना व्हायरस ही आपत्ती घोषित केली आहे. करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबीयांना ४ लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं आपत्ती निधीचा उपयोग करू शकणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचा अधिकारी किंवा एखाद्या देशाच्या राजदुताला भारतात यायचं असल्यास त्याला अटारी-वाघा सीमेवरून प्रवेश देण्यात येईल. यावेळी करोनाची संपूर्ण तपासणी करून भारतात प्रवेश दिला जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलं. भारत-बांगलादेश दरम्यानची रेल्वे आणि बस सेवा १५ एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहे. ही तारीख आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे.
३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद
देशातील निम्म्याहून अधिक राज्यांनी ३१ मार्चपर्यंत शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, हरयाणा आणि केरळचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात शाळा, कॉलेजेससोबत मॉल्सही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत. विदेश दौरे न करण्याचं आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
अनेक देशांमध्ये प्रवास बंदी
अमेरिकेने नागरिकांच्या युरोप प्रवासावर बंदी घातली आहे. यात ब्रिटन आणि आर्यलंडचाही समावेश करण्यात आला आहे. फ्रान्स, इटलीसह अनेक देशांनी प्रवास आणि मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. काही कंपन्यांनी उत्पादनही बंद केले आहे. फरारीने काही दिवसांसाठी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इटलीत करोनाच्या मृतांचा आकडा १२००च्या वर गेला आहे.