नागपूर । निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिका प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून सन २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रलंबित फौजदारी खटल्यांची पूर्ण माहिती न दिल्याबद्दल लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२५ ए अन्वये खटला चालवण्याच्या गेल्या वर्षी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायालयानं समन्स बजावल्यानं आज देवेंद्र फडणवीस न्यायालयासमोर हजर झाले. याप्रसंगी न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना फडणवीस म्हणाले की, १९९५ ते ९८ दरम्यान आम्ही झोपडपट्टी काढण्याच्या कारवाई विरोधात आंदोलन केलं होतं. त्यावेळी माझ्याविरोधात दोन खासगी तक्रारी झाल्या. त्या संपल्या असल्यानं प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या नव्हत्या. न्यायालयानं या प्रकरणात पुढची तारीख दिलेली असल्याची माहिती त्यांनी दिली.