फैजपूर, प्रतिनिधी | संसारिक जीवन जगताना देवाला न विसरता प्रत्येक कर्म केले तर आपल्याला सुख, शांती, समाधान लाभते असे विचार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मांडले. ते चिनावल येथील मासिक प्रवचन ‘अमृतवाणी’ चे निरुपण करतांना बोलत होते.
चिनावल येथील नियोजित सतपंथ मंदिरामध्ये आयोजित मासिक प्रवचन कार्यक्रमात पुढे बोलताना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, माणसाने विचाराने, मनाने श्रीमंत असणे आवश्यक असून वैचारिक श्रीमंतीसह स्वतः साठी वेळ देणे आपल्याकडे पाहिजे अन्यथा आपण दरिद्री आहे असे समजावे. गुरुकृपा ही हृदयात भाव जागृत करण्यासाठी असते. सुदामा दरिद्री नव्हते तर ते श्रीमंत होते. कारण त्यांच्या हृदयात परमात्मा होता आणि ते प्रत्येकाच्या हृदयात परमात्म्याचा वास आहे याची जाणीव करून देत होते. दररोज आपल्याला जो भेटेल त्याच्याशी चांगले बोला चांगले वागा. आपल्या भावात देव असेल तर तो आपल्याला दगड, माती, लाकूड मध्येही दिसेल व त्याची अनुभूती होईल असे सांगून क्षणिक ‘मोह’ माणसाला घातक ठरतो. माता सीतेला सुवर्ण मृगाचा मोह झाला आणि पुढे काय घडले आपल्याला माहितीच आहे. महाराजांनी अनेक विविध दाखले दिले. देव सर्वदूर असताना मंदिराची गरज काय ? असा अनेकांचा प्रश्न असतो. त्यावर महाराजांनी सांगितले की, जर आपल्या गाडीचे टायर पंचर झाले तर… हवा सगळीकडे असताना आमच्या दुकानावर जाण्याची गरज काय ? आपल्याला उत्तर मिळते तेथे पंचर जोडण्याची साहित्य, सर्व टेक्निक म्हणजेच ते पावर स्टेशन आहे. त्याच पद्धतीने मंदिर असते. कोरोना नियमांचे पालन करून सतपंथ मंदिरात काही मोजक्या भाविकांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जगभरातील असंख्य श्रद्धावानांनी घेतला.