हैदराबाद : वृत्तसंस्था । देवाकडून कोरोनाची निर्मिती, मी विषाणूचा मानवी अवतार आहे असा विचित्र दावा दोन लेकींच्या हत्येनंतर आरोपी दाम्पत्यापैकी महिलेने केला आहे
आंध्र प्रदेशातील मुख्याध्यापक दाम्पत्याने अंधश्रद्धेतून पोटच्या मुलींची हत्या केल्याच्या गुन्ह्याला धक्कादायक वळणं मिळत आहेत. कलियुगाचा नायनाट करण्यासाठी देवानेच कोरोना व्हायरसची निर्मिती केली, असा आंधळा विश्वास या दाम्पत्याने व्यक्त केला. दोन्ही मुलींची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहांशेजारी आरोपी आईने गाणी गात नृत्य केल्याचीही माहिती आहे. सतयुग सुरु होणार असल्यामुळे सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, असा हैराण करणारा दावा या माता-पित्याने केला होता.
मांत्रिकाच्या बोलण्याला भुलून आंध्र प्रदेशातील मुख्याध्यापक दाम्पत्याने दोन्ही मुलींची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा आरोपी पती-पत्नी मुलींच्या मृतदेहाजवळ बसून होते. वडील पुरुषोत्तम भानावर आले, परंतु आई पद्मजाही पोलिसांसमोर विचित्र वागत असल्याचं बोललं जातं. २७ वर्षीय अलेख्या आणि २२ वर्षीय साई दिव्या अशी मयत तरुणींची नावं आहेत. शिवालयम मंदिर रोड परिसरात नायडू कुटुंब राहत होतं.
‘कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमध्ये नाही झाली, तर देवाने कलियुगातील वाईट गोष्टींचा अंत करण्यासाठी कोरोनाची निर्मिती केली’ अशी असंबंद्ध बडबड आरोपी आई पद्मजा नायडू करत आहे.
पोलिसांनी पद्मजा नायडूला कोव्हिड चाचणी करण्यासाठी नेलं असता तिने नकार दिला. मात्र तिथेही तिने गोंधळ घातला. “मी कोरोना विषाणूचा मानवी अवतार असून मला चाचणी करण्याची आवश्यकता नाही” असं उत्तर तिने दिलं. मध्येच तिने स्वतःला भगवान शंकराचा अवतारही म्हटलं. आरोपी दाम्पत्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
मोठी मुलगी अलेख्याने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. धाकटी कन्या साई दिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं आहे. साई दिव्या मुंबईत एआर रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थिनी होती. लॉकडाऊनच्या काळात ती घरी परतली होती.
नायडू कुटुंब लॉकडाऊनच्या काळात विचित्र वागत होतं, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. रविवारी रात्री घरातून आरडाओरड ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. डोक्यात डंबेल्सनी प्रहार करुन निर्दयी मातापित्याने लेकींचा बळी घेतला. एका मुलीचा मृतदेह पूजेच्या खोलीत होता, तर दुसरी मुलगी बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. दोघींचे मृतदेह लाल रंगाच्या कापडाने झाकले होते.
आरोपी दाम्पत्याच्या चेहऱ्यावर गुन्ह्यानंतर अजिबात तणाव दिसत नव्हता. पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता त्यांनी चक्रावणारा जबाब दिला. कलियुग समाप्त होत असून सोमवारपासून सतयुग सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही मुली सूर्योदयासोबत जिवंत होतील, असा दावा त्यांनी केला.