जळगाव, प्रतिनिधी | केंद्र साहाय्यित योजना राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत लिंग विनिश्चित वीर्यमात्राचा (सेक्स सॉर्टेड सिमेन) गायी व म्हशीमध्ये कृत्रीम रेतनासाठी वापर करण्यासाठीचा उद्घाटन कार्यक्रम संघाच्या आवारात सुविधा भवन येथे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव दूध संघाचे चेअरमन वसंतराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याकार्यक्रमास संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये तसेच जिल्हा पशुसंर्वधन उपआयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. निलेश चोपडे व जिल्हा कृत्रीम रेतन अधिकारी डॉ. प्रदिप पाटील व संघाचे अधिकारी, दूध संस्थांचे चेअमन, प्रगतीशील दूध उत्पादक व संघाचे कृत्रीम रेतन तंत्रज्ञ उपस्थित होते.
लिंग विनिश्चित वीर्यमात्रा तयार करण्यासाठी मोठा खर्च येत असतो. मात्र यासाठी केंद्र शासन रु.२६१, राज्य शासन रु.१४० व जळगांव दूध संघ रु.१०० एकूण असे रु. ५०१ अनुदान प्राप्त होणार आहे . दूध उत्पादकांना विर्यमात्रा फक्त रक्कम रु. ८१/- उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परंतु केंद्र शासनाने देशात दूध उत्पादन वाढविण्यासाठी नविन प्रणालीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. या योजनेतून ९० टक्के मादी वासरांची अचूकतेसह निर्मिती, उच्च अनुवंशिक मादी वासरांची उत्पत्ती करुन दूध उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच दूग्ध व्यवसाय करण्या इच्छूक असलेल्या शेतकरी व दूध धंदा व्यवसायिक उच्च अनुवंशिक वासरांची वाढीव उपलब्धता आदी फायदे होणार आहेत. सध्या संघाकडे गिर, सहिवाल, जर्सी ५० टक्के, जर्सी १०० टक्के व मुऱ्हा या जातीच्या लिंग विनिश्चित विर्यमात्रा उपलब्ध झालेल्या आहेत. तरी सदर लिंग विनिश्चित विर्यमात्रा वापरासाठी शासनाच्या सुचनाप्रमाणे वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. सदरील योजना प्रायोगितत्वावर असल्यामुळे मर्यादित ठिकाणीच उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जागरुक राहून आपल्या निरोगी जनावरांस कृत्रीम रेतन करुन घेणेबाबत आवाहन दूध संघामार्फत करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी भालोद, कोल्हाडी, न्हावी, साजगांव, तारखेडा, डांगरी, देवगांव, तरडी, कुंवारखेडा, चहार्डी, कासोदा, या संस्थाचे प्रतिनिधी , कृत्रीम रेतन तंत्रज्ञ व संघाचे अधिकारी उपस्थित होते.