दुसऱ्या लाटेत आगामी चार आठवडे काळजीचे

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात कोरोना पहिल्या लाटेपेक्षा यावेळी रुग्णांची संख्या तुलनेत वेगाने वाढत आहे. रग्णवाढीचा वेग चिंताजनक असून  प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पुढील चार आठवडे अत्यंत कळीचे आहेत, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व कोरोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिला.

 

रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात अजूनही रुग्णसंख्या आणि मृत्यू कमी असले तरी ते अधिक वाढू नयेत यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘मोहीम’ म्हणून  नियमांचे पालन करण्याचे आवाहन पॉल यांनी केले. महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगढसह कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात या आठ राज्यांमध्ये  चोवीस तासांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांची भर पडली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी  दिली.

 

दैनंदिन रुग्णवाढ आणि मृत्यू देशभरात जास्त असूनही महाराष्ट्रात केवळ ६० टक्के आरटी-पीसीआर चाचण्या होत असल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण एकूण दैनंदिन नमुना चाचण्यांच्या किमान ७० टक्के असले पाहिजे, अशी सूचना राज्यांना केल्याची माहिती भूषण यांनी  दिली. महाराष्ट्रात आरटी-पीसीआर नमुना चाचण्यांचे प्रमाण कमी होत गेले असून ३ ते ९ मार्च या आठवठ्यात हे प्रमाण ७१ टक्के होते गेल्या आठवड्यात फक्त ६० टक्के आरटी-पीसीआर चाचण्या केल्या गेल्या. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या जिल्ह्यांमध्ये चालत्या प्रयोगशाळांचा वापर करण्याच्या व या नमुना चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना महाराष्ट्राला करण्यात आली आहे.

 

पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर या महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये अजूनही सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असून कर्नाटकमध्ये बेंगळुरू-शहर, दिल्ली आणि या आठवड्यात छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यांची भर पडली आहे. देशातील एकूण उपचाराधिन रुग्णांच्या ५८ टक्के रुग्ण व ३४ टक्के मृत्यू महाराष्ट्रात आढळले आहेत.  महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये, छत्तीसगढमधील ११ जिल्हे आणि पंजाबमधील नऊ जिल्ह्यांमध्ये एकूण ५० केंद्रीय पथके  पाठवली गेली , असे भूषण  यांनी सांगितले.

 

देशात सलग तिसऱ्या दिवशी एका दिवसात ९० हजारांहून अधिक जणांना लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या एक कोटी २६ लाख ८६ हजार ०४९वर पोहोचली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.मृतांची एकूण संख्या एक लाख ६५ हजार ५४७ वर पोहोचली आहे. देशात सोमवारी एका दिवसात सर्वाधिक म्हणजे एक लाख तीन हजार ५५८ जणांना लागण झाली होती. देशात सध्या सात लाख ८८ हजार २२३ उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या ६.२१ टक्के इतके आहे.

 

देशात ५ एप्रिल रोजी २४ तासात एकाच दिवशी ४३ लाख ९६६ जणांना कोविड १९ प्रतिबंधक लस देण्यात आली. एका दिवसात करण्यात आलेल्या लसीकरणाचा हा आतापर्यंतचा उच्चांकआहे.  आतापर्यंत देशात ८ कोटी ३१ लाख १० हजार ९२६ जणांना लस देण्यात आली आहे.

 

सीरम इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांमुळे भारत लस निर्मितीत जगात अग्रेसर आहे, भारताने ज्या पद्धतीने देशांतर्गत लस उत्पादन वाढवले तेही कौतुकास्पद आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी सांगितले.

Protected Content