अहमदनगर: वृत्तसंस्था । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी एक तास ठिय्या मांडला होता. महसूलमंत्री थोरात यांच्या भगिनी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे व त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबे सहभागी झाले होते.
‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मी माझ्या भावाकडे ओवाळणी मागत आहे,’ अशा भावना दुर्गा तांबे यांनी व्यक्त केल्या.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संगमनेर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
त्या म्हणाल्या, ‘माझे बंधू बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर आम्ही आंदोलक जमलो थोरात यांच्याकडे माझी मागणी आहे की, मराठा आरक्षणासाठी ज्या-ज्या त्रुटी आहेत, त्या दूर कराव्यात. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कारण समाज विखुरलेला असून आरक्षण नसल्यामुळे नोकरीत स्थान मिळत नाही. यासाठी माझ्या भावाकडे मी ओवाळणी मागत आहे.’