दुदैव… : बापाने मुलाला दिलेले जीवनदान व्यर्थ ठरले !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे अवघ्या तारुण्यात मुलाच्या दोन्ही किडन्या रिकाम्या झाल्याने जन्मदात्या बापाने एक किडनी दान देऊन आयुष्य वाढवून दिले.त्यासाठी गावांतील ग्रामस्थ,मित्रमंडळी व दानशूर व्यक्तींनी आपल्या यथाशक्तीप्रमाणे आर्थिक स्वरूपात मदत देखील केली.मात्र नियतीला मनात वेगळेच मान्य होते. किडनी प्रत्यारोपण करून अवघे मोजकेच महिनेच होत असताना नियतीपुढे देवेंद्र हरला आणि दुदैवी निधन झाल्याची घटना पातोंडा गावात घडली.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वय वर्षे 29 असलेला अविवाहित तरुण देवेंद्र हा अतिशय देखणा,हळवा स्वभावाचा आणि मित्रांच्या गळ्यातील जणू ताईतच. आई, वडील,भाऊ असा परिवार. आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकलत होते.मात्र दोन वेळेची भाकर सुखाने खात होते अस आनंदी जीवन सुरळीत होते.देवेंद्रही कुटुंबाला साथ म्हणून स्वतःच्या व्यवसायाचे गॅरेज चालवत होता.मात्र ऐन तारुण्यात मोठा मुलगा देवेंद्रला किडनी आजाराने ग्रासले व त्याच्या दोन्ही किडन्या रिकाम्या झाल्याचे निदान झाले. सुखाच्या संसारास नियतीने गालबोट लावला.मुंबई येथील नामांकित रुग्णालयात त्याचे उपचार सुरू झाले.लहान भाऊ व मित्र परिवाराचा त्याच्यासाठी मुंबईमध्ये खटाटोप चालू होता.डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. आपल्या मुलाचे आयुष्य वाढावे व त्याच्या जीवनातील  रंग त्याला भरता यावे यासाठी जन्मदात्या बापाने मोठे मन करून एक किडनी दान करण्याचे ठरविले.मात्र किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी लागणारा अफाट खर्च लाखोंच्या घरात होता.यासाठी मित्रमंडळी, ग्रामस्थ,पंचक्रोशी,नोकरी निमित्ताने बाहेरगावी असलेले व अज्ञात व्यक्तींनी आपापल्या परीने यथाशक्तीप्रमाणे आर्थिक स्वरूपात भरीव मदत केली. आणि सर्व वैद्यकीय चाचण्या करून छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात देवेंद्रचे किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले.आणि जणू सुटकेचा श्वास सुटला.त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊन तो हिरु फिरू लागला आणि आपला व्यवसायात हातभार देखील करू लागला.त्याला लाभलेले आयुष्य यामुळे त्याचे कुटुंबीय,नातलग,ग्रामस्थ व ज्या ज्या दात्यांनी मदत केली होती त्यांना आपल्या कृतीचे समाधान वाटू लागत होते. मात्र किडनी प्रत्यारोपण होऊन अवघे काही महिने होत असतानाच त्याच्या प्रकूतीत बिघाड झाला.आणि पुन्हा कुटुंबाची देवेंद्रसाठी रुग्णालयात घालमेल सुरू झाली.मात्र त्याच्या आयुष्यासाठी कित्येकांनी साथ दिली आणि मात्र नियतीने त्याच्यावर अन्यायच केल्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजत होती.आणि दि.07 रोजी धुळवळीच्या दिवशीच त्याच्या आयुष्याचे रंग नियतीने हिरावून घेतले.आणि देवेंद्रने आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला. त्याच्या दुदैवी निधनाची बातमी गावात पसरताच ग्रामस्थ, मित्र मंडळी,पंचक्रोशी शोक सागरात बुडाली.सोशल मीडियावर त्याच्यावर भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश जोमात वाहू लागलेत.बुधवार रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी देवेंद्रला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता.जन्मदात्या बापाने आपले आयुष्य कमी करून मुलाचे आयुष्य वाढवून दिले.त्यासाठी अनेकांची साथ देखील लाभली आणि त्याला आयुष्य जिंकून दिले.मात्र नियतीच्या मनात वेगळेच खलबलत होते.आणि नियतीपुढे अखेर देवेंद्र हरला.

 

बिरारी कुटुंबावर महिना भरापासून दुःखाचे सावट

पातोंडा येथे बिरारी कुटुंबाची संख्या सर्वात जास्त आहे. घरे वेगवेगळी असली तरीही दुःखाच्या काळात बिरारी परिवाराची एकता मात्र एकच. गेल्या महिना भरापासून बिरारी कुटुंबातील काही घरातील व्यक्ती, महिला, तरुण यांचे एकावर एक निधन होत गेले. एकाचे दुःख सावरत नाही तोपर्यंत दुसरे दुःख उभे ठाकत होते. एकाचा गंधमुक्तीचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत दुसरेच निधन होत होते.यामुळे अनेकांना काशी लागत होती.जवळपास अशा पाच सहा निधनाच्या घटना बिरारी कुटुंबियांवर महिनाभरात घडल्या. दरम्यान बुधवार रोजी बिरारी कुटुंबावरील दुःखाचा डोंगर सावरत असताना देवेंद्रच्या निधनाने पुन्हा बिरारी कुटुंब शोक सागरात बुडाले.

Protected Content